Bahirji Naik बहिर्जी नाईक: शेवटचा दिवस – १
सन १६८५, दक्षिण महाराष्ट्रातील भूपाळगड किल्ला
बाणूरलिंग महादेव मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात मंद वाऱ्याची झुळूक फिरत होती. वृक्षांची पालवी अलगद डुलत होती आणि पिवळी पाने हळूच जमिनीवर स्थिरावत होती. पिवळसर हिरवट रंगाची झुडपे आपल्या अनोख्या गंधाने वातावरणात सुवास पसरवत होती. सूर्य अस्ताला निघाला होता आणि त्याची शेवटची किरणे बाणूरलिंग महादेव मंदिराच्या कळसावर स्थिरावली होती.
इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्यापाठोपाठ कुणीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. मंदिराजवळ कुणाचीही उपस्थिती नव्हती आणि गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत; परंतु आज कुणाचीही चाहूल नव्हती. दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता, त्यामुळे पुजारीही किल्ल्यावर पोहोचला नव्हता. मग तो आवाज कुणाचा होता?
तो आवाज मनुष्याचाच होता. तो मनुष्य जमिनीवर पालथा पडला होता. बराच वेळ झाला, तरी तो अजूनही तसाच पडून होता. त्याच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढला होता. पायात झालेल्या जुन्या जखमेने डोके वर काढले होते आणि त्यातून रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर भरला होता. अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तो पुटपुटला, “शिव! शंभो! महादेव!”
महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरू होता. मधेच महादेवाच्या नामांसोबत, “छत्रपती शिवाजी राजे! छत्रपती संभाजी राजे! भोळा शंकर कैलासास्ती महादेव!” असे नामस्मरण सुरू होते.
भूतकाळात डोकावले
त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती. कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर, आणि धोतराच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती. त्या गाठीच्या आडोशाला शेल्यात एक कट्यार लपवली होती. शतप्रतिशत ती कट्यारच होती. कारण तिच्या मुठीच्या रचनेवरून ते स्पष्ट होत होते. तो मनुष्य पुढे बोलू लागला,
महादेवा, या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चल. याच अपेक्षेनं तुझ्याजवळ पोहोचलो आहे. तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे. तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षी आहेस. तुला सगळं ठावं आहे. या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे; परंतु मी आज विनवणी करतो. या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्रोतात विलीन करवून दे. शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे.” असे म्हणत त्याने कसेबसे हळूच डोळे उघडले, शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला,
“माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या ह्या प्रतीकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो.” असे म्हणत त्या मनुष्याने कमरेतून कट्यार काढली. थरथरत्या हातांनी त्या कट्यारीची मूठ नीट न्याहाळून पाहिली. त्या कट्यारीच्या पितळी मुठीवर सिंहाची प्रतिकृती कोरली होती. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मित करत तो पुटपुटला, “राजे, तुम्ही तुमच्या हातांनी ह्या बहिर्जी नाईकाला दिलेल्या या कट्यारीनं आजपर्यंत कितीतरी गनिमांच्या गळ्यांचे घोट घेतले आहेत. तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कट्यारीच्या मुठीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो. राजे, तुम्ही जाणून होता, मला तलवारीपेक्षा या कट्यारीची प्रत्येक वळणावर गरज भासणार आहे. म्हणून तुम्ही मला ही भेट दिली होती!”
रक्ताचा अभिषेक
बहिर्जी नाईकांनी पुन्हा एकदा कट्यारीची मूठ कपाळाशी टेकवली आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. त्यांच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. लालभडक रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली. जखम झाली असतानासुद्धा, वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता. डोळे बंद करून ते पुटपुटू लागले. “शंभो! शिव! शिवाजी, शंभो!”
मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या. त्यांचा पंजा शिवलिंगाच्या अग्रभागावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर ओघळ उमटले होते. बोलताना आता त्यांना धाप लागत होती. ते हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत होते, “राजे, एक खंत आहे. स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. वीरमरण प्राप्त करू शकलो नाही.”
नाईकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते. काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लालभडक झाले होते. नाईकांच्या श्वासांनी आता वेग घेतला होता. वादळ शांत होण्यापूर्वीची ती तीव्रता असावी. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. तरी ओठांवर मात्र स्मित होते. अर्धपांढरी, घेरदार मिशी ओठांच्या हालचालीने गालांपर्यंत लांबली होती. ते बोलू लागले, “राजे, हे जग मला आता दिसत नाही. बाणूरलिंग महादेवसुद्धा दिसत नाही. राजे हे आश्चर्य आहे. मी धन्य झालो. मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे. तुम्ही समोर आहात राजे, तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तुमचे विशाल कपाळ दिसत आहे. त्यावर मधोमध लावलेला लाल चंद्रकोरी टिळा दिसत आहे.
पांढराशुभ्र अंगरखा, कमरेला तेजस्वी भवानी तलवार, डोक्यावर मंदिल, शिरपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा, काळेभोर बोलके डोळे, गळ्यात भोसले घराण्याची, आई भवानीने दिलेली कवड्यांची माळ. महाराज, तुमचे रूप पुन्हा पाहायला मिळाले.
धन्य झालो. मी धन्य झालो. मी स्पष्टपणे पाहू शकतो आहे राजे. तुम्ही रायरेश्वर शिवलिंगावर रक्त अभिषेक करून महान स्वराज्याची शपथ घेत आहात. राजे खरोखर मला तुम्ही दिसत आहात. हा भास आहे की पुनर्जन्म? मला दिसत आहे राजे, तुमच्यासोबत महान स्वराज्याचे प्रमुख स्तंभ तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुद्गल, नरसप्रभू गुप्ते हेसुद्धा आहेत. महाराज मीही आहे; पण काय तुम्हाला मी दिसत आहे? सांगा प्रभू, हाक द्या मला.
धावत येऊन छातीशी धरा. हे खांदे आसुसले आहेत राजे. तुम्ही सोडून गेलात तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी हे कान उतावीळ झाले आहेत. डोळे तळपत आहेत. राजे आलिंगन द्या तुमच्या या हनुमंताला.”
शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरूच होता. महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता, तर थेंबाथेंबात सामावलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक होता.
अंतिम श्वास
बहिर्जी नाईकांचा श्वासोच्छ्वास आता मंदावला होता. अंगात ज्वर आणखी वाढला होता. नाकाने श्वास घेणेसुद्धा अवघड झाले होते. आता ते मुखावाटे मोठमोठ्याने श्वास घेत होते. श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच ‘राजे’ या शब्दाचा उच्चार निघत होता. शेवटचे काही क्षणच अजून त्यांची प्राणज्योत तग धरू शकत होती. त्यांचे शरीर निपचित पडले होते. पापण्या अर्धवट उघड्या होत्या. त्यांच्यासमोर आता जीवनातील काही महत्त्वाचे क्षण उभे राहत होते. जे त्यांच्या नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते, ते क्षण जाता जाता डोळ्यांसमोरून तरळून जात होते. हे क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याचे समाधान शेवटच्या घटिकेतसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
शिवाजी महाराजांना गमावण्याव्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते. फक्त त्याचवेळी त्यांच्या नेत्रांतून अश्रू वाहिले होते. हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते. तलवारीच्या किरकोळ जखमांव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधी मिळाले नव्हते; पण आता उतारवयात एका किरकोळ जखमेनेच त्रास वाढवला होता.
एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले हे शरीर होते. ही अद्भुत शक्तीच महाराजांची ‘अदृश्य शक्ती’ होती. जी कुणालाही दिसू शकत नव्हती. कुणी ओळखूही शकत नव्हते. कुणी समजूही शकत नव्हते. वाऱ्याचा वेग होता. सिंहाचे धाडस होते. सरड्याचे कौशल्य होते. हरणाची चपळता होती. सूर्याची चमक होती आणि बुद्धी? बुद्धी तर इतकी तल्लख की आयुष्याच्या साठ वर्षांत, कपट कारस्थानात माहीर असलेले शत्रू असूनसुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीचा बादशहा औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही, की शिवाजी राजांच्या दरबारात कोणी बहिर्जी नाईक नावाची व्यक्ती आहे.
शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत, युद्ध जिंकलीत, स्वराज्याचा गाडा योग्यरित्या हाकू शकले, त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला.
पहिल्या भेटीची आठवण
बहिर्जी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते. जेव्हा ते पहिल्यांदा शिवबांना भेटले होते तेव्हा ते बहिर्जी नाईक नाही, तर रामोशाचे दौलतराव होते.
To be continued